Tuesday, May 12, 2020

कोण हे रमेश कराड?


गोपीनाथ मुंडे यांचे अतिशय जवळचे समर्थक असेलेले लातूर ग्रामीणचे नेते रमेश कराड यांना भाजपानी विधानपरिषदेवर उमेदवारी देऊन वंजारी समाजाला चुचकारले आहे. रमेश कराड हे एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांचे पुतणे तर डॉ. मंगेश कराड यांचे ते बंधू आहेत.  वंजारी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने या समाजात भाजपविरोधाी लाट निर्माण झाली होती. हा समाज आपल्या पक्षापासून दूरावला जाऊ नये.  म्हणून ही खेळी भाजपाने खेळली आहे. संभाजीराव निलंगेकर यांनी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने लावून धरली होती.  केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे असेलेले निलंगेकर यांच्या मागणीला होकार देत पंकजा मुंडेच्या जवळचे असलेले रमेश कराड यांना ही उमेदवारी दिली आहे.

दोन्ही नेत्यांच्या जवळकीताचा फायदा कराड यांना झालेला आहे.  त्यांनाही उमेदवारी देऊन  विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी लातूर ग्रामीण मधून निवडणूक लढविण्याची तयारी रमेश कराड यांनी केलेली होती. मात्र त्यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला होता. कराड यांचा चांगला जनसंपर्क असताना देखील शिवसेनेला हा मतदारसंघ सोडल्याने तीव्र नाराजी होती. ही नाराजी दूर करण्याची संधी भाजपाच्या नेतृत्वाने साधली आहे.  भाजपाच्या डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने कराडांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाकडून आता रणजिंतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रविण दटके आणि लातूरचे रमेश कराड यांची आमदारकी निश्चित झाली आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून रमेश कराड भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केलं.


भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत नव्या चेहर्‍यांना संधी आहे. परंतु विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून रमेश कराड यांनीही अर्ज भरल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पक्षाने जाहीर केलेल्यांपैकी एकाचा पत्ता कट होऊन रमेश कराड यांची वर्णी लागेल, असा अंदाजही वर्तवला जात होता. हीच शक्यता खरी ठरत रमेश कराड आता भाजपचे अधिकृत उमेदवार बनले आहेत.
लातूर ग्रामीण मतदारसंघ हा रेणापूर मतदारसंघाचाच एक भाग आहे. रेणापूर मतदारसंघावर पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व राहिले. कराड हे मुंडे यांचे कट्टर समर्थक. 2009 मध्ये लातूर व रेणापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन लातूर ग्रामीण मतदारसंघ तयार झाला. मुंडे यांच्या निधनानंतर लातूर ग्रामीणमध्ये पक्ष जिवंत ठेवण्याचे काम कराड यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा सामना करणे तेवढे सोपे नव्हते. पण कराड यांनी लातूर ग्रामीणमध्ये एकाकी खिंड लढवली. कराड कुटुंबियांचा वारसा आणि ग्रामीण भागातील संघटनाच्या जोरावर 2009 पासून श्री.कराड हे आमदार होऊन विधीमंडळात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. यातून त्यांनी 2009 ची विधानसभेची निवडणूक लढवली. यात काँग्रेसचे वैजनाथ शिंदे यांनी . कराड यांचा साडेतेवीस हजार मतांनी पराभव केला. 


2014 मध्ये काँग्रेसचे त्र्यंबक भिसे यांनी कराड यांचा साडेदहा हजार मतांनी पराभव केला. सलग दोन पराभव होऊनही कराड यांनी आपली जिद्द सोडली नाही. सातत्याने लोकांशी संपर्कात राहिले. तीन वर्षापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण रात्रीतून त्यांनी हा अर्ज मागे घेत पंकजा मुंडे गटात परत येत धनंजय मुंडे यांना धक्का दिला होता. 2019 च्या निवडणुकीत वातावरण चांगले होते. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी कामही सुरु केले होते. पण ऐनवेळी भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली. काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा विजय सुकर व्हावा या करीता पक्षाने ही जागा शिवसेनेला सोडली असा जाहिर आरोपही कराड समर्थकांच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर या निवडणुकीत कराड फारसे दिसले नाहीत. पण काही महिन्यापूर्वी त्यांना लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद देवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. पक्षाचे कामही त्यांनी सुरु केले होते.  पक्षाने आधिकृत जाहिर केलेले उमेदवार डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी कराड यांना अधिकृत उमेदवारी देऊन धक्कातंत्राचा वापर केला. ही निवडणूक बिनविरोध निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे कराडांच्या भाळी आमदारकीचा टीळा लागणार आहे. गेली बारावर्षापासून त्यांचे आमदारकीचे स्वप्न आता साकार होणार आहे. पक्षालाही जिल्ह्यात बळ मिळणार आहे. आतापासूनच त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करू लागले आहेत.

1 comment: