Saturday, September 24, 2022

पवारांचा पॉवरफुल गड काबीज करणार?

 पवारांचा पॉवरफुल गड काबीज करणार?


दिगंबर दराडे
बारामती


संपूर्ण देशभरात सुरु केलेल्या मोहिमेनुसार भाजपने बारामतीमध्येही काम सुरु केलं आहे. महत्त्वाच्या नेत्यांच्या सातत्याने इकडे दौरे होतील. पक्ष संघटनेचा आढावा घेतला जाईल आणि लोकांच्या अपेक्षा आणि विकासाचा आढावा घेतला जाईल असं भाजपकडून सांगण्यात येत असले तरी याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे.
पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग भाजपनं आतापासूनच फुंकलं आहे.


 सर्वात प्रथम अमेठी म्हणजे बारामती नव्हे समजून घेतले पाहिजे. अमेठी आणि बारामतीचा विकास यामध्ये दोन टोकाचे अंतर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सातत्याने देशांमध्ये सरकार विरोधात आघाडी सुरू करण्याचा होत असलेला प्रयत्न जागीच रोखण्यासाठी हा डाव टाकण्यात आला आहे. देशामध्ये आता तरी दुसरे कोणतेही नेतृत्व सरकार विरोधात मोट बांधण्याचा कट रचत नाहीत.  त्यामुळे पवार कुटुंबियांना बारामती मध्ये अडकवण्याचा हा डाव असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंतच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये विजयाच्या जवळ येणार्‍या निवडणुकीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी लढवली होती. ही निवडणूक नको वगळता या मतदारसंघांमध्ये अन्य कोणत्याही नेत्याला फारसे यश मिळालं नाही. या मतदारसंघांमध्ये मराठा समाज आणि धनगर समाजाचे वर्चस्व आहे. बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर या परिसरामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाला आपलेसे करण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यशस्वी ठरले होते. त्यावेळी बारामतीच्या सुप्रिया सुळे विरोध यांच्या लढतीमध्ये चमत्कार पाहायला मिळाला होता. हा चमत्कार पुन्हा पाहण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा मोट बांधत आहे.  2014 मध्ये भाजपची लाट होती. त्यात सुप्रिया सुळेंचं मताधिक्य 70 हजारांवरच आलं पूर्वी ते 3-4 लाखांपर्यंत असायचं. त्यानंतर सुप्रियाने मेहनत घेतली आणि 2019 मध्ये ती मार्जिन दीड लाखापर्यंत वाढवली. भाजप जिंकण्याच्या जवळ गेला. पण हरवू नाही शकला. आता असा आत्मविश्वास असण्याची शक्यता आहे की दीड लाखांपर्यंत मताधिक्य खाली आणलंच तर जिंकणंही शक्य आहे. 2009 साली सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता. 

त्यानंतर 2014 ची निवडणूक मोदी लाटेत पार पडली आणि सुप्रिया सुळेंविरोधात रासपच्या महादेव जानकरांचं आव्हान होतं. ही लढत मात्र सहज झाली नाही. फक्त 69,719 मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला. 2019 च्या निवडणुकीत भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत 1 लाख 55 हजार मतांनी सुळे विजयी झाल्या.

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, माधुरी मिसाळ, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली भाजप बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यामुळे काही अंशी राजकीय नेत्यांना बळ आले आहे. हे बळ टिकवण्याचे आव्हान मोठे आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातल्या दोनमध्ये राष्ट्रवादीचे, दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तर दोन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत.
अमेठीच्या जोडीला बारामती उभी करताना दोन्हीमधला फरक लक्षात घेण्याची  गरज असते. अमेठीच्या विकासाकडे स्थानिक नेतृत्वाने दुर्लक्ष केले. राजकारणातील बदलता प्रवाह लक्षात घेऊन मतदारांशी संपर्क ठेवण्यात राहुल गांधी अपयशी ठरले, त्याचा फटका त्यांना बसला. बारामतीची परिस्थिती वेगळी आहे. इथे खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसंपर्क पाहिल्यानंतर लक्षात येते की, देशातील कुणीही खासदार त्यांच्याइतका मतदारसंघासाठी देत नाही. एखादा आमदारही संपर्कात नसतो, तेवढ्या खासदार असूनही सुप्रिया सुळे मतदारांच्या संपर्कात असतात. संसदीय कामकाजासाठी दिल्लीत नसतात, तेव्हा उरलेला जास्तीत जास्त काळ त्या मतदारसंघात असतात. शरद पवार आणि अजित पवार यांच्या दूरदृष्टितून झालेला झालेला बारामतीचा विकास हा अधिकचा भाग आहे.
भारतीय जनता निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केलेली असताना शरद पवार यांचा अपवाद वगळता विरोधी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरल्याचे चित्र नाही. प्रकृती ठीक नसताना आणि याही वयात शरद पवार यांच्यात राजकारण करण्याची असणारी ऊर्मी आणि सतत भटकंती करण्याची त्यांच्यात असणारी ऊर्जा विस्मयचकित करणारी आहे. एखादी घटना म्हणा की कोणाचाही प्रतिवाद करायचा असेल तर एखादा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांत प्रतिक्रिया अपलोड करावी किंवा एखादा ई-मेल माध्यमांना पाठवून दिला की, विरोधी म्हणा की सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची सामाजिक बांधिलकी संपली असल्याच्या सध्याच्या जमान्यातही शरद पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असतात, लोकांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात.  भेटायला गेलेल्या लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची चिकाटी अजूनही कायम आहे. तरुणांच्या बैठकीत तर तर साडेतीन-चार तास एकाच जागी बसून त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे शरद पवार हे कदाचित राज्यातील एकमेव नेते असावेत. त्यांच्या मुलीला हरवण्यासाठी नुसते दौरे फायदेशीर ठरणार नाहीत. मतदारसंघात पोलखोल करावा लागेल. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार हा अतिशय हुशार, समृद्ध असा आहे. त्यामुळे या मतदारसंघात केवळ विकासाचे गाजर चालत नाही. तर लोकांना विकास हवा असतो. जो हा विकास या लोकांना देऊ शकणार आहे तोच या मतदारसंघाचा भावी खासदार असेल.