Friday, August 19, 2022

... लंडनमध्ये जेव्हा रोमांच उभे राहतात

 

(( London calling....in the memories ))

छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारताच प्रत्येक माणसाच रक्त सळसळतं.  त्यांचे कर्तृत्व एवढ मोठ आहे. की या महान माणसांची दखल जगाला देखील घ्यावी लागली आहे. आपली माणसं कधी कधी आपल्याला नव्याने कळतात आणि आपण त्यांच्या पुन्हा पुन्हा.. प्रेमात पडतो. असाच अनुभव मी मागील दहा दिवसांमध्ये घेतला.

लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट  म्युझियमला भेट दिली. याठिकाणी शिवाजी महाराजांच्या तलवारीला अभिवादन करण्याचे भाग्य मला लाभले. लंडन शहर अनेक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या दोन गोष्टी पाहण्याची मनाला उत्सुकता लागली.   शिवाजी महाराजांची तलवार आणि लंडन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहते घर पाहताना भारावून गेलो.  एक मिनिट स्थिर न बसणारा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरासमोर तब्बल एक तास शांतपणे बसून राहिलो. तिथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक आमच्या डोक्यामध्ये  घालणारे माझे सर डॉक्टर श्रीराम गडकर व्हिडिओ कॉल केला.

सरांना आंबेडकरांचे घर दाखवलं.  काही वेळासाठी हरवून गेलो होतो. यावेळी एकच मनात विचार आला. सध्याच्या काळामध्ये एवढ्या सुविधा वाढल्या आहेत. आपली भारतीय लोक देखील अन्य देशात स्थिरावत आहेत. मात्र 1921-22 कोणतीही पार्श्वभूमी नसलेला तरुण शिक्षणाची वाट निवडत लंडन गाठतो. तेथे गोऱ्या लोकांच्या शेजारी राहून आपल्या देशाचे भवितव्य या महामानवाला मनापासून वंदन करताना अंगावर शहारे उभा राहतात. तर शिवाजी महाराजांची जगदंब तलवार पाहताना मनातील विचार ठप्प होतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विद्यार्जनाच्या काळात लंडनमधल्या ज्या घरात राहत होते ते प्रत्यक्ष पाहणे हा माझा  भटकंतीचा मुख्य उद्देश होता.  प्रथम लंडनमधल्या पॅिडग्टन स्थानकापर्यंत ट्रेननं जाणं क्रमप्राप्त होतं. त्यापुढे भुयारी रेल्वेनं प्रवास करून मी नॉर्दर्न लाइनवर असलेल्या कॅम्डेन भागातील चॉकफार्म या उत्तर लंडनमधल्या एका टुमदार टय़ूब स्टेशनवर उतरलो. चॉकफार्म स्थानकासमोरचा रस्ता ओलांडून प्रिमरोझ हिल्सच्या दिशेनं जाणारा एक लोखंडी पूल पार करताच उजव्या हाताला असलेला किंग हेन्री रोड दिसला. त्या रस्त्यानं केवळ काही पावलं चालून जाताच तिथं मला हवं असलेलं दहा क्रमांकाचं घर दिमाखात उभं असलेलं दिसलं. घराच्या आसपासचा परिसर सुंदर, शांत, आणि स्वच्छ होता. कोणे एकेकाळी ‘प्रिमरोझ हिल्स’ नावानं ओळखला जाणारा हा परिसर वनराईनं व्यापला होता. राजघराण्यातली मंडळी या भागात शिकारीस येत असत. आज हा परिसर श्रीमंत आणि धीमंतांच्या निवासस्थानांनी व्यापलेला आहे.

दहा क्रमांकाचं घर ही स्वतंत्र इमारत नव्हती. तीन-चार घरं एकमेकांना चिकटून उभी होती. इंग्लंडमध्ये अशी अनेक घरं आहेत. इमारतीनं शंभर पावसाळे पाहिले असूनही ती भक्कमपणे उभी होती. कालपरत्वे आवश्यक डागडुजी झालेली दिसत होती. घराचा दरवाजा उत्तम प्रतीच्या लाकडाचा होता. दरवाजाच्या बाजूला िभतीवर एक गोलाकार तबकडी दिसत होती. तिच्यावर फिकट निळ्या अक्षरात लिहिलं होतं- ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर- १८९१-१९५६. इंडियन क्रूसेडर फॉर सोशल जस्टिस लिव्हड् हिअर इन् १९२१-१९२२.’ पाटी वाचताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.  काहीशा भारावलेल्या मन:स्थितीत मी त्या घराच्या पायरीवर नतमस्तक झालो आणि त्या भारतीय महापुरुषाला नि:शब्दपणे अभिवादन केलं. 

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही सरस्वतीच्या या उपासकानं लंडनमधल्या कुणाच्यातरी मालकीच्या या घरात निवारा शोधून, अनेकदा अर्धपोटी राहून आपला विद्याभ्यास मोठय़ा चिकाटीनं केला होता. थोड्या प्रमाणात महाराजांचं आणि आंबेडकरांचे वाचन केल्यामुळे अनेक गोष्टींना मनामध्ये उजाळा मिळत होता. गोऱ्या लोकांच्या देशांमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लायब्ररीच्या समोर डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा फोटो लावला आहे. हा फोटो पाहून प्रत्येक भारतीय तरुणांची छाती दोन इंच फुगल्या शिवाय राहत नाही. राणीच्या म्युझियममध्ये आशियाई देशातील वस्तू  ठेवण्यात आलेल्या आहेत.  या ठिकाणी चकचकणारी महाराजांची तलवार पाहून अंगावर शहारे येतात.

@Digambar Darade
 London