Sunday, May 24, 2020

कुछ तो गडबड है..










मे महिन्यातील उन्हाच्या झळा वाढण्याबरोबरच कोरोना रुग्णाची संख्या जशी वाढत आहे. तशीच महाराष्ट्राच्या राजकारण देखील चांगलेच तापू लागले आहे.  राज्यपालांच्या समोरची खासदार संजय राऊत यांची नम्रता, अजित पवारांना डॉक्टर म्हणून घेतलेला चिमटा आणि मंत्री कपातीची घोषणा.. आणि पृथ्वीराज बाबांचे हे सरकार आपलं नसल्याची क्लिप या  बर्‍याच बाबी राजकीय विचारवंताना विचारच करायला लावणार्‍या बाबी आहेत. याकडे कोणीच दुर्लक्ष करुन चालणार नाही.  

 

महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारखे महामारीचे संकट आले. या संकटातून प्रयत्न काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करीत आहेत. त्यांना अन्य मंत्र्यांची साथ किती मिळत आहे.  याविषयी कोणीच काही न बोलले बरे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे टीव्हीसमोर येऊन देशातील नागरिकांना आवाहन करीत असतात. या आवाहनाला जनता देखील तेवढाच प्रतिसाद देताना दिसत आहे.   महाआघाडीचे सरकार आल्यानंतर ते समन्वयानी चालविण्यासाठी काही शरद पवार यांनी एक नियमावली ठरवली आहे. ती नियमावली कोणीच तोडायची नाही. असे ठरलेले असताना महाआघाडीतील नेत्यांची वक्तव्य पहायली तर कुछ तो गडबड है.. असेच वाटत आहे. कोणीच कोणतीच संधी सोडताना दिसत नसल्याचे वास्तव पहायला मिळत आहे.

 

पुण्यात एका वर्तमानपत्राने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. अजित पवार हे आमच्या सरकारची स्टेपनी आहेत. यामुळे आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, स्टेपनीसुद्धा महत्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येत नाही, असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या गाडीचे नट काढण्याचे काम केले. महाविकास आघाडीची गाडी सुसाट निघाली आहे. त्यामुळे तिला थांबवणं शक्य नाही, असंही राऊत म्हणाले होते.  मागील दोन दिवसापूर्वी पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्मार्टसिटी या ठिकाणी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या देशभरात कोरोना सारखा महामारी रोग सुरू आहे.  यामुळे  बूम  आपल्याजवळ आणू नका अशी टिपणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलण्याच टाळलं. माञ  मीडियाशी कधी बोलणार,  असं विचारल्यावर त्यांनी कोरोना संपल्यावर असं जुजबी उत्तर दिलं. तर दोन मिनिट बोला असं म्हटल्यावर, त्यांनी जो माणूस महिना महिना इथं येत नाही. तो काय बोलणार, अशी विरोधकांच्या आरोपावर उद्विग्न प्रतिक्रिया दिली. 

 

स्थिती कंट्रोल मध्ये आहे का असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर  रोज प्रेस घेऊन सांगतात असे सांगितले. पत्रकारांनी आपल्यापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तो बुम जवळ आणू नका त्यानं कोरोना होतो, अशी टिप्पणी करत ते निघून गेले. याच बूमचा विषयी पकडून खासदार संजय राऊत यांनी संधी साधली ती अजित पवार यांच्यावरच.. राऊत यांचा हजरजबाबीपणा कधीच लपून राहत नाही.  यामध्ये अजित पवारही हुकत नाहीत. याचा प्रत्यय अनेक वेळा येत आहे.  

 

राज्यपाल यांच्या भेटीनंतर संजय राऊत पत्रकारांना भेटण्यासाठी आले. यावेळी त्यांनी सांगितले अजित पवार काल म्हणाले आहे. तो बूम लांब ठेवा.. त्यांने करोना होतो असं डॉक्टर अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यातही डॉक्टर या शब्दावर अधिकच भर होता.  राऊत असे का बोलले असतील.. हे राजकीय जाणकरांना चांगलेच समजले असेल.  राज्यपालांच्या भेटीनंतरचा अजित पवारांना काढलेला चिमटा राजकीय विचारवंताना विचार करायला लावणार आहे.  याच बरेाबर जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते, ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेर्‍या यांच्यातील शांतता हतबलताच दाखवत आहे, हे असेच सुरु राहिले, तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल, असे भाकित राऊत यांनी वर्तविले आहे.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नसून शिवसेनेचे सरकार असल्याची भावना काँग्रेस नेत्यांच्या मनात असल्याचं चित्र आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यकर्त्यासोबत कथित संभाषणाची ध्वनिफीतही समोर आली आहे.  पृथ्वीराज चव्हाण आणि एका व्यक्तीमधील दूरध्वनीवरील संवाद यामध्ये ऐकू येतो. स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने त्या व्यक्तीने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता.

 

मी मंत्रीमंडळात नाही. पण शिफारस करेन. आमचं सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे होईल असा वाटत नाही. निधी सगळा परत घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांचे समोरच्या व्यक्तीला सांगणे होते. तुमचं नाव मोठं आहे, तुम्हाला भविष्यात संधी आहे असं कार्यकर्ता म्हणाला असता जेव्हा होती संधी, तेव्हा दिली नाही अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी खदखद व्यक्त केल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतं. या सर्वबाबी राजकीय विचारवंताना विचार करायला भागच पाडतात. 

--
Digambar Darade

Friday, May 15, 2020

नाथाभाऊ पॉवरफुल ते ऑफरफुल


नाथाभाऊनी आपल्या पक्षाची ४० वर्ष सेवा केली. अनेकांना मोठं केलं. संघटन वाढवलं. या काळात हा नेता अतिशय पॉवरफुल होता. आता मात्र हा नेता ऑफरफुल झाला आहे. विविध राजकीय पक्षातून नाथाभाऊंना आपल्या पक्षात येण्याच्या ऑफर मिळत आहेत. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमध्ये ये ण्यासाठी ऑफर दिली आहे. विधानसभेत उमेदवारी नाकारल्यानंतर खडसे पक्षाबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत होते. विधानसभा निकालानंतर त्यांनी पक्षांतरांच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेवून चाचपणीही केली होती. मात्र त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. मात्र आता विधानपरिदेतही पक्षाने न्याय न दिल्याने ते पक्षातून बाहेर पडण्याच्या निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. मात्र "कोरोना'चे सावट कमी झाल्यानंतरच त्यांना निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

नाथाभाऊंनी राज्यातील पक्षनेतृत्वाशी सरळसरळ बंड पुकारले असून राज्यात नव्हेतर चक्क दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील बड्या नेत्यांशी जवळकी साधली आहे. आता नाथाभाऊ स्वत: बाहेर पडणार की भाजपला महाराष्ट्रातील सत्तेतून कायमचे बाहेर ठेवणार याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.  त्यांना थेट कराचीतून दाऊद इब्राहीमने फोन केल्याची खळबळजनक बातमी,  पुण्यानजीक भोसरी या औद्योगिक नगरीमध्ये करोडो रुपयांचा भूखंड खडसे यांनी आप्तस्वकियांच्या नावाने बळकावल्याचा धक्कादायक आरोप,या घटनांनी नाथाभाऊ अडचणीत आले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे  इतक्या गाळात जाऊन रुतले की पक्षालाही त्यांची पाठराखण करणे अशक्य झाले. त्यानंतर ते पक्षात मागे पडले. अधूनमधून आपल्या अस्तित्वाची जाणीव खडसे करून देत राहिले असले तरी त्यांच्याकडे पक्ष नेतृत्त्वाने सरळसरळ दुर्लक्ष केले होते. 

विधानसभा निवडणुकीच्या वेळी वारंवार बंडाचा इशारा देऊनही पक्षनेतृत्त्वाने त्यांची दखल घेतली नाही. त्यांना विधानसभेचे तिकीट दिले नाही. त्यामुळे खडसे अधिकच नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना नाही पण त्यांची मुलगी रोहिणी यांना विधानसभेचे तिकीट दिले. पण, त्याही निवडून येऊ शकल्या नाहीत. आता पक्षांतर्गत बंडखोरी करून आपल्या मुलीला पाडण्यात आले असा आरोप खडसे यांनी केला. सध्या ते पक्षही सोडायला तयार आहेत. पक्ष सोडून मात्र ते जाणार कुठे तर शिवसेनेत जाणार असे म्हटले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावतीने कळवळा दाखवत खडसे आमचे जुने स्नेही आहेत असे म्हटले आहे.महाराष्ट्राला राजकिय बंड काही नविन नाही. 


शरद पवारांनी कॉंग्रेसविरुध्द दोन वेळा केलेल,भुजबळांनी सेनेविरुध्द केलेल,विलासराव व सुशिलकुमारांनी पवारांविरुध्द केलेल,राणेंनी व राजनी उध्दवविरुध्द केलेल, अस प्रत्येक राजकिय बंड महाराष्ट्राची राजकिय भुमी हादरवुन गेल.  छगन भुजबळ, नारायण राणेंनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरुध्द केलेल. गोपिनाथ मुंडेंनी गडकरींच्या 'किचन कॅबिनेट'विरुध्द केलेल बंड येत. तसेच गेल्या काही महिन्यात दत्ता मेघेंच,कर्नल सुधिर सावंतांच,वैभव नाईकांच बंडही झाले. राजकारणात काहीच अंतिम नसते. परिस्थितीनुसार तत्वे, आदर्श बदलत असतात त्यामुळे खडसे हे काही मुलाखावेगळे करत आहेत असेही नाही. आपले राजकीय वजन कमी होउ नये म्हणुन खडसे पाउल उचलत आहेत. विधानपरिषदेत  उमेदवारी नाकारल्यानंतर खडसे पक्षाबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. 


नाथाभाऊनी ग्रामपचांयत सदस्यपदापासून सुरू केलेल्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात बळकट केलेच. मात्र  स्वत:च्या कार्याचा ठसा उमटवित त्यांनी राज्यातील पदे मिळविली. सन 1998 मध्ये युतीच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद झाले.  तर सन 2008 ते 20015 या कालावधीत त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवलं. धडाकेबाज विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी आपला नावलौकिक वाढवला. याकाळात त्यानी सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर विधीमंडळ व विधीमंडळाच्या बाहेरही जोरदार हल्ला करून भाजपची जनतेत एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. पॉवरफुल नेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या  राजकारणात दोनच गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे. एक म्हणजे भाजप आणि दुसरे भाजपचे नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ. दिल्ली असो की महाराष्ट्राची गल्ली, भाजप आणि नाथाभाऊंनी प्रत्येकाला चर्चेचा विषय झाला आहे. 

Wednesday, May 13, 2020

फडणवीसांचे प्रभावी गटाचे राजकारण!

भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  प्रभावी गटाचे राजकारण सुरू केले आहे. पक्षातील स्वकियांचा विरोध संपून टाकण्यासाठीची ते  कोणतीच संधी सोडत नसल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते पार्टी विथ ए डिफरन्स अशी स्वतःची ओळख सांगत होते. आमच्याकडे पक्षांतर्गत लोकशाही आहे. सर्वजण मिळून चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतला जातो असे सांगितले जाई.
कॉंग्रेससारखं आमच्याकडे हायकमांड नाही आणि दिल्लीश्वर ही नाहीत असे सांगितले जाई. वाजपेयी अडवाणी यांच्या काळात बऱ्याच प्रमाणात ही वस्तुस्थिती होती. व नरेंद्र मोदी अमित शहा  यांच्या काळात ही परिस्थिती पूर्ण बदलली आहे. 

केंद्रातील काही तर राज्यातील देखील निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेत असताना दिसत आहेत. सध्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी शहा यांच्याकडे असल्याने भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आहेत.पण त्यांना निर्णय घेण्याची किती अधिकार आहेत याबद्दल शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आधी रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष होते. आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी आहे. सर्वकाही निर्णय घेतात ते देवेंद्र फडणवीस  यांच्या निर्णयानुसार त्यामुळे पक्षांमध्ये कुठे लोकशाही दिसत नाही. पक्षाच्या बैठकीत फक्त एक दोन जणांची भाषणं होतात  असे एकनाथ खडसे यांनी जाहीर मुलाखतीत सांगितले.

मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे अडवाणी मुरलीमनोहर जोशी यांना अडगळीत टाकले त्याप्रमाणे आता महाराष्ट्रातही जुन्या जाणत्यांना पद्धतशीरपणे अडगळीत टाकण्याचे काम सुरू आहे. मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे ही त्यातील काही प्रमुख नावे.  एकनाथ खडसे सर्वात जास्त 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदावर दावा करीत होते. पण मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे फडवणीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.  पण खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर जाणे भाग  पाडले. त्यानंतर त्यांना सतत डावलले जात आहे. विधानसभेचे तिकीट नाकारले मंग राज्यसभेत आणि विधान परिषदेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ती संधी दिली गेली नाही. असे का केले जाते त्याची कारणे दिली जात नाहीत.

 महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असे सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत पद्धतशीरपणे पराभूत केले.  आता विधान परिषदेचे तिकीट कापण्यात आले.  2014 मध्ये विनोद तावडे यांना गृहमंत्री व्हायला आवडेल असे बोलून दाखवले जात होते. त्यांचेही पक्षाने तिकीट कापून टाकली कट टू  साईज केले आहे. सध्या सुरू असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील फडणीसांच्या मर्जीतील नेत्यांना संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. आपल्यापेक्षा कोणीही मोठे होऊ नये यासाठी गांधी घराणे सतत प्रयत्न करते अशी टीका केली जात होती. तेच आज भाजपमध्ये चालू आहे. भाजप मध्ये या टाईप गटबाजी नाही असाही दावा केला जातो. हे ही तितकेसे खरे नाही. आपल्या पसंतीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन राज्यांमध्ये आपल्या प्रभावी गट निर्माण करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू  दिसते. महाराष्ट्रात आपणच भाजपचे कार्यकर्ते आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याची मोदी यांची घोषणा होती पण काँग्रेसमधून मेगा भरती करून भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे. आता कार्यपद्धती पावलावर पाऊल टाकून भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे.

Tuesday, May 12, 2020

कोण हे रमेश कराड?


गोपीनाथ मुंडे यांचे अतिशय जवळचे समर्थक असेलेले लातूर ग्रामीणचे नेते रमेश कराड यांना भाजपानी विधानपरिषदेवर उमेदवारी देऊन वंजारी समाजाला चुचकारले आहे. रमेश कराड हे एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांचे पुतणे तर डॉ. मंगेश कराड यांचे ते बंधू आहेत.  वंजारी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने या समाजात भाजपविरोधाी लाट निर्माण झाली होती. हा समाज आपल्या पक्षापासून दूरावला जाऊ नये.  म्हणून ही खेळी भाजपाने खेळली आहे. संभाजीराव निलंगेकर यांनी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने लावून धरली होती.  केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे असेलेले निलंगेकर यांच्या मागणीला होकार देत पंकजा मुंडेच्या जवळचे असलेले रमेश कराड यांना ही उमेदवारी दिली आहे.

दोन्ही नेत्यांच्या जवळकीताचा फायदा कराड यांना झालेला आहे.  त्यांनाही उमेदवारी देऊन  विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी लातूर ग्रामीण मधून निवडणूक लढविण्याची तयारी रमेश कराड यांनी केलेली होती. मात्र त्यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला होता. कराड यांचा चांगला जनसंपर्क असताना देखील शिवसेनेला हा मतदारसंघ सोडल्याने तीव्र नाराजी होती. ही नाराजी दूर करण्याची संधी भाजपाच्या नेतृत्वाने साधली आहे.  भाजपाच्या डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने कराडांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाकडून आता रणजिंतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रविण दटके आणि लातूरचे रमेश कराड यांची आमदारकी निश्चित झाली आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून रमेश कराड भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केलं.


भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत नव्या चेहर्‍यांना संधी आहे. परंतु विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून रमेश कराड यांनीही अर्ज भरल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पक्षाने जाहीर केलेल्यांपैकी एकाचा पत्ता कट होऊन रमेश कराड यांची वर्णी लागेल, असा अंदाजही वर्तवला जात होता. हीच शक्यता खरी ठरत रमेश कराड आता भाजपचे अधिकृत उमेदवार बनले आहेत.
लातूर ग्रामीण मतदारसंघ हा रेणापूर मतदारसंघाचाच एक भाग आहे. रेणापूर मतदारसंघावर पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व राहिले. कराड हे मुंडे यांचे कट्टर समर्थक. 2009 मध्ये लातूर व रेणापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन लातूर ग्रामीण मतदारसंघ तयार झाला. मुंडे यांच्या निधनानंतर लातूर ग्रामीणमध्ये पक्ष जिवंत ठेवण्याचे काम कराड यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा सामना करणे तेवढे सोपे नव्हते. पण कराड यांनी लातूर ग्रामीणमध्ये एकाकी खिंड लढवली. कराड कुटुंबियांचा वारसा आणि ग्रामीण भागातील संघटनाच्या जोरावर 2009 पासून श्री.कराड हे आमदार होऊन विधीमंडळात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. यातून त्यांनी 2009 ची विधानसभेची निवडणूक लढवली. यात काँग्रेसचे वैजनाथ शिंदे यांनी . कराड यांचा साडेतेवीस हजार मतांनी पराभव केला. 


2014 मध्ये काँग्रेसचे त्र्यंबक भिसे यांनी कराड यांचा साडेदहा हजार मतांनी पराभव केला. सलग दोन पराभव होऊनही कराड यांनी आपली जिद्द सोडली नाही. सातत्याने लोकांशी संपर्कात राहिले. तीन वर्षापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण रात्रीतून त्यांनी हा अर्ज मागे घेत पंकजा मुंडे गटात परत येत धनंजय मुंडे यांना धक्का दिला होता. 2019 च्या निवडणुकीत वातावरण चांगले होते. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी कामही सुरु केले होते. पण ऐनवेळी भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली. काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा विजय सुकर व्हावा या करीता पक्षाने ही जागा शिवसेनेला सोडली असा जाहिर आरोपही कराड समर्थकांच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर या निवडणुकीत कराड फारसे दिसले नाहीत. पण काही महिन्यापूर्वी त्यांना लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद देवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. पक्षाचे कामही त्यांनी सुरु केले होते.  पक्षाने आधिकृत जाहिर केलेले उमेदवार डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी कराड यांना अधिकृत उमेदवारी देऊन धक्कातंत्राचा वापर केला. ही निवडणूक बिनविरोध निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे कराडांच्या भाळी आमदारकीचा टीळा लागणार आहे. गेली बारावर्षापासून त्यांचे आमदारकीचे स्वप्न आता साकार होणार आहे. पक्षालाही जिल्ह्यात बळ मिळणार आहे. आतापासूनच त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करू लागले आहेत.

Monday, May 11, 2020

मुंडेच्या कपाळी संघर्षाचा तिलक

काही शब्द प्रत्येक माणसाला चिकटलेले असतात. असाच एक शब्द गोपीनाथ मुंडे साहेबांच्या देखील नावाला चिकटला होता. बहुतेक या वाटेची सुरुवात पुन्हा एकदा झालेली  दिसत आहे. याची कारण काही असतील संघर्ष मात्र तोच असणार आहे. संघर्ष माणसाला मजबूत बनवतो. असचं काही माणसाकडे पहिल्यानंतर वाटत. राजतिलकपण त्याच कापळावर शोभून दिसतो. अशाच संघर्षाने गोपीनाथ मुंडे साहेबांना मजबूत केले होते. महाविद्यालयीन जीवनापासून राजकरणात असणा-या गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच अन्याया विरुध्द संघर्ष केला. जनतेचे प्रश्न घेऊन सत्ताधा-यांविरोधात लढणारा नेता अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख झाली. 

एका सामान्य शेतकरी कुटुंबात मुंडे यांचा जन्म झाला होता. गोपीनाथ मुंडे यांचे आई-वडिल वारकरी होते. मुंडे यांनी बालपणी गरीबी अनुभवली होती. एका सामान्य शेतक-यांच्या घरात जन्मल्याने शेतक-यांचे प्रश्न काय असतात याची त्यांना चांगली जाणीव होती. म्हणूनच नेहमीच त्यांनी शेतक-यांच्या प्रश्ननावरुन सत्ताधा-यांविरोधात रान उठवले. शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. जिल्हापरिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री या प्रवासात सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर जुळलेली नाळ त्यांनी शेवटपर्यंत कायम टिकवून ठेवली. दांडगा लोकसंपर्क हे गोपीनाथ मुंडे यांचे आणखी एक वैशिष्टय. फक्त बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात मुंडे यांचे नेतृत्व मानणारा एक मोठा वर्ग होता. या वर्गाला मुंडे यांच्या वर झालेला अन्याय कधीच सहन होत नसे.

साहेबानच्या वर अन्याय करण्याची काय कोणामध्ये हिंमत होती. याच कारण त्यांना गरिबांच्या प्रश्नानी मजबूत केले होते. पत्रकारांनापण या नेत्याच खूप कौतुक होते. बहुतेक पत्रकारांना नेत्यांचे कौतुक नसते. याला अपवाद मुंडे साहेब होते. एका कार्यक्रमात साहेबाच्या  गाडीत एवढे लोक बसले की त्या गाडीत त्यांना बसायला जागा राहिली नाही. त्यावेळी साहेब बोले या गाडीचे मालक ते आहेत. अनेक मोठी माणसं गाडी किती जपतात आपण ते पहायल आहे. मात्र मुंडे त्याला अपवाद होते. साहेब नेहमी बोलत सामान्य माणूस माझी ताकद आहे. अनेकांच्या जीवनात पद येतात जातात..मात्र मुंडे साहेबांच्यामुळे सामान्य माणसाला मोठी पद छोटी वाटू लागली. जसं सचिन खेळत असताना शोएब अखतर देखील गल्लीतील बॉलर वाटत असत. तशीच अवस्था राजकीय पदांची झाली होती. संघर्षापुढे पद उजळली होती. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना, मुंडे यांच्याकडे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्रीपद होते. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा एक अमीट ठसा उमटवला होता.


भाजपची सुरुवातीला ब्राम्हणी चेहरा असलेला पक्ष अशी ओळख होती. पण भाजपची ही ओळख सर्वाथाने बदलण्याचे संपूर्ण श्रेय मुंडे यांना जाते. त्यांनी भाजपला महाराष्ट्रात तळा-गाळात रुजवले. समाजातल्या वेगवेगळया घटकांना भाजपसोबत जोडले. महाविद्यालयीन जीवनात प्रमोद महाजन यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या मुंडे-महाजन जोडीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत भाजपला तळागाळात रुजवले. माझ्या एका पुण्यातील मित्रानी मुंडे लोकसभेला पडणार अशी पैज लावली होती. त्यावेळी मी मुंडे 1 लाख मतांनी निवडून येतील असं सांगितले. त्यावेळी मुंडे साहेबाना एकटे पाडण्याचे प्रयत्न झाले होते. यामध्ये स्वकीय देखील होते आणि  विरोधकपण होते. तरी मुंडेची मत का वाढली असा प्रश्न राजकीय तज्ञांनी निर्माण केला. जेव्हा ते पडत त्यावेळी त्यांची ताकद सामान्य जनता होत. जनता पेटून उठत. लोकांच्या प्रेमापुढे साहेबांच डोक चालत नसे. 


रात्री 2 वाजता कार्यकर्ते भेटत असत. का आलेत असे विचारलं की कार्यकर्ता बोलायचा  साहेब तुम्हाला भेटायाला आलो. साहेब बसा बोले की ताकद याची. याच लोकांनी बीडमधुन मोठया मताधिक्क्याने विजय मिळवून दिला. राजकरणातील  मुंडेची ताकद  दाखवून दिली.
ग्रामीण भागात काम केल्याने मुंडे यांना ग्रामीण जनतेच्या समस्या चांगल्या माहिती होत्या. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली होती. मुंडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत धडाक्यात कामाला सुरुवातही केली होती. यावेळी साहेबाना विरोधक ही फोन करत होते. त्यांना साहेब गंमतीने बोलत असत..आता तुमच्यावरील अन्याय दूर करणार.. मात्र दुर्देवाने या कार्यक्षम नेत्याला एका रस्ते अपघाताने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यावेळी देखील संघर्षाचा तिलक कपाळी कायम राहिला.