Monday, June 20, 2022

फडणवीसांचाच चमत्कार



दिगंबर दराडे


महाविकासआघाडीतील अस्थिरतेचा पुरेपूर फायदा घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली  रणनीती यशस्वी ठरवली आहे. भारतीय जनता पार्टीकडे मतांचा कोटा नसताना देखील उमेदवार उभा करून तो निवडून आणून दाखवण्यामध्ये टीम देवेंद्रला यश मिळाले आहे. नेमकी कोणाची मते फुटली यावर माध्यम राजकीय विश्लेषक चर्चा करतीलच.. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत पाठोपाठ दुसऱ्यांदा पराभवाला जाणे हे चिंतन करायला लावणारे आहे.
मी पहिल्यापासून सांगत होतो की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही.


विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभा निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता १३४ मतं घेतली आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणून आपल्या सदसदविवेक बुद्धीनं आमदार आमच्या पाचव्या उमेदवाराला मत देतील आणि तेच झालं. आमच्या पाचव्या उमेदवाराला एकही मत नव्हतं. पण आमचा पाचवा उमेदवार विजयी झाला. या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने पुढील काळामध्ये महाविकास आघाडीला विचार करावा लागणार आहे.  फडणवीसांनी आखलेलीआखलेली रणनिती पुन्हा एकदा यशस्वी झालेली पहायला मिळाली. 

पुन्हा एकदा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बळ दिलं.  या निकालाने महाराष्ट्रात नवी नांदी पाहायला मिळणार आहे. आज सरकारमधील असंतोष बाहेर आलाय. 
राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही. 

 विधान परिषदेचे विजयी उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते) शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी- प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (विजयी) काँग्रेस -चंद्रकांत हंडोरे पराभूत  झाले आहेत. तर भाई जगताप विजयी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात चुरसीची लढत होईल, असं चित्र दिसत होतं. पण प्रसाद लाड यांनी विजयी बाजी मारली. 

 राज्यसभेत पुरेशी मते नसतानाही भाजपने तीन जागा जिंकल्या. भाजपचे १०६ आमदार आहेत. काही अपक्ष आमदार भाजपबरोबर आहेत. भाजपच्या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली. यावरून भाजपने दहा अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा संपादन केला होता.२००८ आणि २०१० मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊन धक्कादायक निकाल लागले होते. २००८मध्ये काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभ‌व झाला होता. गणगणे यांचा पराभव हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठा धक्का होता. 

२०१०मध्ये ८३ आमदार असलेल्या काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून येऊ शकत होते. पण तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धोका पत्करून चौथा उमेदवार उभा केला होता. विजयासाठी तेव्हा २६१९ पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता होती. काँग्रेसचे चौथे उमेदवार विजय सावंत यांना पहिल्या पसंतीची अवघी १३०० मते मिळाली होती. काँगेसचे तीन व राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या आधारे पुरेश मते नसतानाही काँग्रेसचा चौथा उमेदवार निवडून आला होता. त्या निवडणुकीत विद्यमान परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि भाजपच्या शोभाताई फडणवीस यांच्यात चुरशीची लढत झाली होती. शेवटी २४१५ मते मिळविणारे अनिल परब विजयी झाले तर २२९१ मि‌ळालेल्या भाजपच्या शोभाताई फडणवीस या पराभूत झाल्या होत्या. अपक्ष, मनसे व छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावरच अशोक चव्हाण यांनी  अवघी पाच मते अतिरिक्त असताना चौथी जागा निवडून आणली होती. अशाच प्रकारे या निवडणुकीचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे.