Tuesday, June 16, 2020

बंगला तोच... खासदार शेट्टी ते आमदार शेट्टी


‘एकच गट्टी राजू शेट्टी’ हा सर्वसामान्य माणसाचा आवाज भाजपाने दाबला असला तरी गोविंद बागेतील ‘पॉवरफूल’ ताकद त्यांच्यामागे उभी राहिली. एकेकाळी गोविंद बागेतील बंगल्यासमोर आंदोलन करणारे खासदार राजू शेट्टी आता त्याच बंगल्यातील जादूने आमदार होत आहेत. शरद पवार यांनी निवडणूकीच्या वेळी दिलेला शब्द खरा ठरत आहे. दिलेल्या शब्दानुसार राजू शेट्टी यांना आमदार होण्याचा मान मिळत आहे.


बारामतीमध्ये ज्या गोविंदबागेसमोर तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदासाठी तीव्र आंदोलन केले. त्याच ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत स्नेहभोजन घेत आमदारकी संबंधी चर्चा झाली.  पाठीमागे युतीचे सरकार आण्यामध्ये राजू शेट्टींचा मोठा वाटा होता. पंधरावर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऊसदर आणि दूधाच्या आंदोलनावरुन त्यांनी ‘सळो की पळो’ केले होते. सत्ते आलेल्या युती सरकारने शेट्टी यांचे महत्व कमी करण्यासाठी त्यांचे जवळचे निकटवर्तीय सदाभाऊ खोत यांना मंत्री केले. शेट्टींचा ‘स्वाभीमान’ दुखवला. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ धरली. 

निवडणूकींच्या दरम्यान शरद पवारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकीची ऑफर दिली होती. दोन्ही काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतर ‘स्वाभिमानी’कडे दुर्लक्ष केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता राज्यपाल नियुक्त म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टींना आमदारकी द्यायचा निर्णय घेतल्याने ही नाराजी दूर होणार आहे.  मागील काही दिवसांच्यापूर्वी राजू शेट्टी यांच्या मातोश्री आजारी असल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील यांनी शेट्टींच्या घरी भेट दिली. याच दरम्यान राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यात बंदखोलीमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे या विषयावर चर्चा झाली. 

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्या पासून फारकत घेतल्यानंतर ते भाजपकडे झुकले होते. भाजपने त्यांना विधान परिषदेमध्ये संधी दिली होती. मात्र तेव्हा त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी न देता भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज भरायला लावला होता. यामुळे तांत्रिकदृष्ट्या सभागृहांमध्ये खोत हे भाजपचे आमदार म्हणूनच होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेट्टी यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवल्यावर शेट्टी हे स्वाभिमानीचे उमेदवार असणार? की राष्ट्रवादीचे? असा मुद्दा उपस्थित झाला होता.

राजू शेट्टी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता. इ.स.2009 च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना 95 हजार 60 मतांनी पराभूत करून धक्का दिला होता. हा पराभव त्यावेळी पवारांच्या जिव्हारी लागला होता. नाराज शेट्टींची अडचण ओळखली आणि पवारांनी त्यांना जवळ केले. मी शत्रूला (विरोधकांना) संपवतो. जेव्हा मी त्यालाच माझा मित्र बनवतो. हे अब्राहम लिंकनचे वाक्य शरद पवारांनी खरे करुन दाखविले आहे.  

Tuesday, June 2, 2020

साहेब पंकजा संघर्षाच्या चक्रव्यूहात !



आपण गरिबांची, सर्वसामान्यांची,  दलितांची उपेक्षितांची सेवा केली. याच लोकांनी तुम्हाला मोठ केलं. घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य नसताना देखील आपण  देशाचे मंत्री झालात. आपल्या वाट्याला पण खूप संघर्ष आला. तो संघर्ष कितीही लपवला. पचवला तरी तो लपून राहिला नाही.  विरोधकांनी आपणास राजकारणातून संपविण्याची भाषा केली. तुमच्या विरुद्ध  फौज उभा केली. मात्र जनता हीच तुमची तोफ होती. या तोफेसमोर अनेक जण गारद झाले.  ते केवळ तुमच्या कर्तृत्वावर.. आपण विरोधात होता की सत्तेत लोकांना आठवतही नसेल मात्र आपण मोठे होतात. हे सगळ्यांनाच माहिती आहे. साहेब संघर्षाने तुमच्या व्यक्ती महत्वाला एक वेगळी चमक आली होती.

संघर्ष, अडचणी,  प्रश्न मुंडेना नवे नाहीत. याच वळणावर आपल्या कन्या पंकजा मुंडे आल्या आहेत. आजच्या दिवशी हा  चक्रव्यूह तोडण्याचा आपण सल्ला तर देत नसाल ना! तीन जून केवळ मुंडे कुटुंबसाठी नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वसामान्य माणसासाठी काळा दिवस आहे. लाखांचा पोशिंदा असलेले गोपीनाथ मुंडे साहेब याच  दिवशी सर्वांना सोडून गेले. नियती कधी उलटते आणि नशिबाचे पारडे कधी फिरते, हे कोणीही सांगू शकत नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी त्याचा पुरता अनुभव घेतला.

मुंडे साहेबांच्या जाण्याचा परिणाम सामान्य माणसाला आजही भोगावा लागत आहे.  मात्र त्यांच्या कन्या  असलेल्या पंकजा मुंडेना अधिक सोसावा लागणार आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांची तर हानी झालीच आहे पण पक्षासमोर महाप्रश्न उभे राहिले आहेत. यात बहुजन चेहर्यासह जमीनीशी जुळलेल्या या नेत्याच्या जाण्याने झालेली हानी कशी भरणार ते ‘डॅमेज कंट्रोलर’ची भुमिका कोण बजावणार? मुंडे यांना पर्याय कोण? सोशल इंजिनिअरिंग कसे साधणार? या प्रश्नांची उत्तरे भाजपाच्या नेत्यांना शोधावी लागणार आहेत. त्यांनी आयुष्यात नेहमीच संघर्ष केला. काही वेळेस विरोधकांनी त्यांना आव्हान दिले तर बर्‍याचदा स्वकीयांनीही त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सर्वांना पुरून उरले.
           !!!  मुंडे साहेब अमर रहे !!! पंकजा मुंडे यांचे निर्णय बरोबर की चुकीचे  हे  मांडण्याचे व्यासपीठ नाही. मात्र मुंडे साहेबांचे निधनानंतर पंकजा मुंडे यांच्या वाट्याला जे आले आहे.  ते अन्य कुणाच्या वाट्याला येऊ नये. आपल्या घरातील महिला साधी भाजी आण्यासाठी मंडईत गेली तरी घरून तिला आपण चार चार वेळा फोन करतो. मात्र याच पंकजाताई साहेबांच्या जाण्यानंतर आपले  विश्व सोडून जिद्दीने कामाला लागल्या.  पायामध्ये भिंगरी बांधून राज्य भर फिरल्या.  संघर्ष यात्रा काढली. त्यांना यश देखील आले. राज्यात सत्ता आली.

एक महिला म्हणून कोणाचा आधार नसताना संघर्ष करणे फार कठीण असते. मात्र लढणे हे मुंडेच्या रक्तात आहे. त्यांची लढाई अन्य कोणाशीही नव्हती तर ती भावाशी होती. आपल्या च माणसाशी लढताना तीव्र वेदना असतात. त्या कोणाला सांगता ही येत नाहीत. अटीतटीच्या या लढतीत एक तर भाऊ जिंकणार किंवा बहिण जिंकणार एवढाच मुद्दा होता.
 माध्यमांसाठीही हा चर्चेचा विषय होता. निवडणूकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.  या पराभवानंतर पंकजा मुंडे कुठे चुकल्या यावर अनेकांचे गप्पाचे फड सुरु झाले.  ओबीसी समाजात फूट पाडण्याचे ही प्रयत्न झाले.  याकडे अद्याप तरी पंकजा मुंडे शांतपणे पाहत आहेत. आज महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षात आहे विरोधी पक्षात राहून काम करण्याचे तंत्र मुंडे साहेबांनी शिकवलं. हे तंत्र आजच्या भाजपमध्ये दिसत नाही. मुंडे हे एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेणारे किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून बैठका जिंकणारे नेते नव्हते. तर गावागावांमध्ये जाऊन खेड्यापाड्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा सामना करणारे नेते होते. अशा नेत्यांची आज भाजपमध्ये वानवा आहे.
लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी,  प्रमोद महाजन,  गोपीनाथ मुंडे यांचा भारतीय जनता पार्टी पक्ष आता राहिलेला नाही. या पक्षातील ध्येयधोरण आता सगळी बदलली आहेत. क्षणाक्षणाला निर्णय घेताना त्यांना मुंडे साहेब आठवत असतील. एखादा माणूस आपल्यात असण्यापेक्षा नसल्याचे अधिक जाणवते. महाराष्ट्रातील ओबीसी समाज आज सैरभैर झाला आहे. त्यांना त्यांच्या हक्काचे नेतृत्व मिळत नसल्याची जाणीव लोकांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.  मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर पक्षातील पंकजा यांच्या समाजाच्या एकहाती नेतृत्वाला सुरंग लावण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे.  पाच वर्षांपूर्वी मुंडे यांच्या अकाली निधनामुळे  पंकजा मुंडे यांना वारसाहक्कने समाजाच एकहाती नेतृत्व आणि फारसा अनुभव नसताना मंत्रिमंडळात संधी मिळाली जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ या इच्छेने पाच वर्षे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी अंतर्गत स्पर्धेत पंकजा यांची भूमिका कायम वादादीत राहील्या. पंकजाना यांना टाळून अन्य नेत्यांना विधान परिषद दिली असे सांगितले जाते. औरंगाबादचे भागवत कराड यांनाही थेट राज्यसभेवर घेण्यात आले.  विधान परिषदेवर उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून कागदपत्रांची जमवाजमव करत असलेल्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
 दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसा मुळे वजांरी समुहात पंकजा यांनाच मान्यता असल्याने, इतरांना खासदारकी, आमदारकी  देऊन एकहाती नेतृत्वाला सुरूंग लावण्याचा अंतर्गत विरोधकांचा डाव जरी असला तरी तो कदापि यशस्वी होणार नाही. कारण मुंडे संघर्षाने अधिक उजळून निघतात.

--
Regards

Digambar Darade
Mob- 9860305843