Tuesday, April 19, 2022

कोल्हापूरला सहानुभूतीचे पारडे जड



महाविकास आघाडी सरकार व भाजपातील सत्तासंघर्ष पराकोटीचा झालाय. अशा परिस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीचाही महाराष्ट्रभर गाजावाजा झाला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांच्या प्रदेश अध्यक्षांच्या, चंद्रकांत पाटलांच्या प्रभावाचा, यश अपयशाचा मुद्दा यामागे होता. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. त्यांच्या पत्नी, भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे होते. महाविकास आघाडीतील ठळक जाणवणारा समन्वय, जनतेच्या मनातील दिवंगत नेत्याबद्दलची समंजस सहानुभूती, आणि या मतदारसंघात जिवंत असलेला पुरोगामी काॅंग्रेस विचार यामुळे भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. 

विद्यमान आमदाराचे निधन झाले, आणि त्याच्या पत्नीने पतीचा पक्ष सोडत पक्ष बदल करत निवडणूक लढवली, तर यश मिळत नाही, इतके मतदार पक्के असतात, हे यापूर्वी खडकवासला सारख्या काही पोटनिवडणुकांत दिसून आले होते. कोल्हापूर मध्ये ६० टक्के मतदान झाले. त्यात विविध विचारांची मते असली तरी सहानुभूतीचे पारडे जड झाले हे नाकारता येणार नाही. 

 शिवसेनेने गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पुन्हा उमेदवारी न देता काँग्रेसला पाठिंबा दिला. महाविकास आघाडी धर्माचे पालन केले. जाधव यांना ९६१७६ तर कदम यांना ७७,४२६ मते मिळाली. १८,७५० मतांची आघाडी महाविकास आघाडीला मोठे बळ देणारी ठरली. विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणेचे आघाडीच्या नेत्यांवरचे संशय गडद करणारे, छापे व धाडसत्र ,कारवाईचा विळखा असताना हे यश तिन्ही पक्षांच्या ताकदीमुळे व 'शाहू नगरी'तील जनतेच्या मनातील सहानुभूतीमुळे मिळाले. 

भाजपने या निवडणुकीत हिंदूत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. तर महाविकास आघाडीने शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार या निवडणुकीत विजय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला होता. महाविकास आघाडीतील सर्वच जेष्ठ नेते तसेच युवा नेतेही प्रचारासाठी कोल्हापुरात होते. तसेच भाजपच्या बाजूने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून होते. 

 प्रचारासाठी बाहेरुन लोक आणले अशी टीका भाजपवर झाली. त्यावर चंद्रकांत पाटलांचे ' आमचे कुटुंब आहे कोणाच्याही घरी लग्न असले तरी आम्ही जातो.' हे उदगार काहीही झाले तरी ही लढत जिंकायची ही जिद्द दाखवून देणारे होते. २०१४ च्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार  व महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित कदम यांना 'आयात' करून रिंगणात आणत भाजपने शर्थीचे प्रयत्न केले. रिपाइं, जनसुराज्य, सदाभाऊ खोत यांचा रयत पक्ष, गोपिचंद पडळकर यांचा समाज, शिवसंग्राम, आवाडे गट, महाडिक गट यांच्या खास मतांवरही भाजपची मदार होती. 

एखाद्या सदस्याचे जर निधन झाले तर त्या जागेवर होणारी निवडणूक बिनविरोध होते, अशी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. येथे तसे झाले नाही अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत होते. तर आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्दयांवर लढली. पूर परिस्थिती, विमानतळ विस्तारीकरण हे विकासाचे मुद्दे असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत होते. 

 पहिल्या फेरीपासून जयश्री पाटील यांना मिळालेली आघाडी पाहून अखेरीस पाटील यांनी पराभव मान्य केला. भाजपचे दोन खासदार होते, आता भारतभर आमचा पक्ष पसरला हे समाधान ( पराभव झाल्यानंतर भाजपकडून नेहमी व्यक्त होणारे) देखील व्यक्त केले.) 
 विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सहानुभूतीमुळे जयश्री जाधव यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

 कोल्हापूरचे पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील  'किंगमेकर' ठरले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सेनेच्या नेत्यांना सोबत घेत चंद्रकांत पाटील यांना व महाडिक परिवाराला  शह दिला. कोल्हापुरात महाविकास आघाडीत मोठा समन्वय असल्याने हा विजय शक्य झाला, असे सतेज पाटलांचे म्हणणे आहे. 

सतेज पाटील  यांनी रचलेल्या व्यूहरचनेप्रमाणे आघाडीचे नेते उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहिले. तर हिंदुत्व, शिवसेनेचे संपवण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दा,यामुळे  भाजपाने निवडणूकीच्या प्रचार धार्मिक  मुद्याच्या वळणावर पोहचवला.

सतेज पाटलांची विजयानंतरची प्रतिक्रिया भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली हे मान्य करणारी आहे. ते म्हणतात, कोल्हापूर शहर पुरोगामी आहे हे दाखवून देण्याचे काम इथल्या नागरिकांनी केले. भाजपने विखारी प्रचार केला. ज्या प्रभागातून सर्वाधिक मतांची अपेक्षा होती तिथून आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला. यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करु. भाजपच्या मताचा टक्का वाढलेला सकृतदर्शनी दिसत असले तरी त्यात पुढे सातत्य राहणार नाही.

No comments:

Post a Comment